पंचकर्म का करायचे ?

Panchakarma Ka karave 2

पंचकर्म का करायचे ?

वर्षानुवर्षे आपण आपल्या मनात येईल तसं वागत असतो. वाटेल ते खात असतो. सणासुदीच्या
निमित्ताने किंवा लग्न समारंभात, किंवा कुठंतरी बाहेर फिरायला गेल्याचे निमित्ताने वाट्टेल ते तेलकट, गोड,
चमचमीत पदार्थ खात पित असतो. त्यात खाण्यापिण्याच्या वेळांचे ही भान नसते. व्यायाम तर नाहीच-
कधी आळशीपणा मुळे तर कधी वेळ नाही अशा कारणांमुळे.

आठवड्यातून १ दिवस तर हक्काचा.. बाहेर जेवणाचा असतोच. आता तर घरीच आणून द्यायला
लागले आहेत  “हे बाहेरचे जेवण” .. उपवासाच्या निमित्ताने वेगवेगळे उपवासाचे पदार्थ- साबुदाणा, बटाटे,
रताळी इ. खरं तर उपवासाच्या दिवशी लंघन करायचे असते हे सांगावं लागतं हल्ली… तसंच जेवणाच्या
वेळांचे सुद्धा आहे. हल्ली रात्रीची पण हॉटेलं चालू असतात म्हणे!! झोपेत तुम्हाला भूक लागली तर?! पण
रात्र ही विश्रांतीची वेळ आहे हे लक्षातच राहत नाही. मग रात्री झोप पूर्ण नाही झाली म्हणून दुसऱ्या
दिवशी दुपारी ताणून द्यायची (झोप).

कोणत्याही कार्यक्रमांमध्ये गेल्यावर जेवताना यजमानांचा आग्रह खूप होता म्हणून पथ्य सांभाळू
नाही शकलो असे उत्तर तर मला रोजच ऐकायला लागते. असाच आग्रह यजमानांनी व्यायामाचा धरला
असता तर किती बरं झालं असतं ना ?!!
एकदा जेवण झालं की परत त्यांनंतर जाऊन आईस्क्रीम / कॉल्डड्रिंक/कॉफी/ मिल्कशेक इ.सारखे
पदार्थ भूक नसताना सुद्धा खाल्ले जातात. उन्हाळ्यात बाहेरून आल्या आल्या फ्रिज मधील थंड पाण्याची
बाटली काढून ते थंडगार पाणी पिणे आणि पावसाळ्यात गरमगरम चहा नामक पेय सारखा पित राहणे
याने शरीरावर भयानक परिणाम होतात हे लक्षात ही येत नाही. असं वागता वागता अनेक वर्षे निघून
जातात.आणि अचानक एके दिवशी कोणतातरी आजार निर्माण होतो आणि मग सगळी धावपळ सुरू होते.
सगळे डॉक्टर सांगतात वजन कमी करा, स्ट्रेस कमी करा, खाणं कमी करा, पथ्य सांभाळा, गोळ्या
सुरू करा, इ.इ..

मग अचानक जाग येते. पण वेळ पुढे सरकलेली असते. वजन कमी करण्यासाठी झटापट सुरू
होते. वेगवेगळे प्रयोग शिरू होतात. कोण म्हणतं १५ दिवसात ५ किलो कमी करून देतो, कोणी म्हणतो
डाएट करा, कोणी म्हणतो व्यायाम करा, कोण म्हणतं एकदाच खा, कोण म्हणतं दिवसातून ४ वेळा खा
इ.इ. सगळं करून होतं पण फरक काही पडत नाही. तात्पुरता बदल होतो आणि परत तेच. आता इतक्या
वर्षांच्या चुकीच्या खाण्या-पिण्याच्या – वागण्याच्या सवयीने झालेला परिणाम इतक्या लगेच कमी होईल
का ?

तर आयुर्वेद म्हणतो की या सगळ्यांचा नायनाट करायचा असेल तर पंचकर्म म्हणजे शरीराचे
शोधन (शुद्धी) करून घ्या. जे दोष शरीरात साठले आहेत त्यांना बाहेर काढून टाकण्यासाठी उत्तम उपाय
म्हणजे पंचकर्म. दर वर्षी एकदा तरी करून घ्यावे. पावसाळ्याचा सिझन हा पंचकर्मासाठी उत्तम. आपण
जसे आपल्या गाडीचे सर्व्हिसिंग करून घेतो ना तसंच वेळीच शरीराचे सर्व्हिसिंग – पंचकर्म रूपाने करून
घेतले तर अनेक आजार लांब ठेवता येतील. आणि गरज पडलीच तर कमीतकमी औषधांनी आजार बरा
करता येतो.

पंचकर्म कोणते करावे हे वैद्यानेच ठरवावे लागते. त्याचा कालावधी पण वैद्यानेच ठरवावे लागते.
आयुर्वेदाच्या म्हणण्याप्रमाणे सगळे आजार हे अयोग्य आहार विहारानेच होतात. म्हणून त्यात बदल करणे
अपरिहार्यच आहे. पण आजकाल च्या फास्टफूड आणि धकाधकीच्या / धावपळीच्या जीवनात सगळंच पथ्य
सांभाळणं शक्य होत नाही. म्हणून पंचकर्माचा जास्त उपयोग करून घेता येतो…

Madhura Bhide
madhura@recovalife.com
2 Comments
  • Raj Gokhale
    Posted at 22:03h, 11 August Reply

    Mala karayachay

    • Madhura Bhide
      Posted at 06:24h, 30 September Reply

      Hello! Apologies for replying this late, you could connect with our clinic at 83800-16116 for an appointment.

Post A Comment