
05 Feb काय करू या वजनाचे ??!!
हल्ली कित्येक लोकांना पडणारा हा प्रश्न आहे. काही ठराविक वाक्ये पेशंट माझ्याकडे येऊन सांगतात.
ती अशी – १) सगळं करून झालं हो पण वजन काही कमी होत नाही, २) मी काही खात नाही तरी वजन वाढतच चाललंय, ३) मी भरपूर व्यायाम करते तरी वजन कमीच होत नाही, ४) उपवास केले तरी वजन कमी होत नाही, ५) लग्न होत नाही वजन जास्त असल्यामुळे, इ. अशा बऱ्याच complaint करत रुग्ण माझ्याकडे येतात.
सर्वात अगोदर वजन वाढले म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. नुसते डायटिंग आणि व्यायाम केला कि झालं अस नाही. कारणांनुसारच वजन वाढण्याची चिकित्सा करावी लागते.
काही वेळा असे ही बघितले जाते कि भरपूर व्यायाम चालू असतो पण वजन कमी होत नाही त्या ऐवजी वजन वाढतेच. असं होण्याचं कारण शरीरात बिघडलेला वात असतो. म्हणून वाताची चिकित्सा करावी लागते. पंचकर्माची मदत घ्यावी लागते. पित्त वाढलेले असताना शरीरात खूप बदल होतात. खाल्लेले अन्न नीट पचत नाही आणि ते शरीरात पडून राहते आणि मग वजन वाढायला लागते.
कधी कधी उपवास केल्याने वजन वाढते असे लक्षात आले आहे. या सर्व परिस्थितीमध्ये रुग्णाच्या प्रकृति चा खूप मोठा सहभाग आहे. आणि त्या प्रकृतिला अनुसरूनच चिकित्सा करावी लागते. आणि त्याप्रमाणेच पथ्य ठरवावे लागते. एखादा कफ प्रकृतीच्या रुग्णाचे वजन वाढले असेल तर त्याची चिकित्सा वेगळ्याच पद्धतीने करावी लागते. कफ प्रकृतिची व्यक्ती ही मूळतःच वजनदार असते. शरीर संघटन हे अधिक बळकट असते आणि त्या व्यक्तीला त्या वजनाचा काहीच त्रास आणि लक्षणे दिसत नाही, अशा व्यक्ती उत्तम व्यायाम करू शकतात. भरपूर व्यायामाने ही ह्या व्यक्ती दमत नाहीत. आहार पण चांगला मजबूत असतो. थुलथुलीतपणा नसतो. अशा व्यक्तीचे वजन कमी करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि जर लक्षणे काहीच नसतील तर वजन कमी करण्यात काही अर्थ ही उरत नाही. या वजनाचा पुढे काही त्रास होईल की नाही हे BMI ने ठरवता येते. जर BMI २५ च्या आत असेल तर अशा कफ प्रकृतीच्या व्यक्तीचे वजन योग्य आहे असे समजले पाहिजे.
आयुर्वेदाने सुद्धा मेदोरोगाचे वर्णन केले आहे. शरीरात अतिरिक्त मेद संचिती झाली असल्यास ती त्रासदायक असू शकते. आणि पुढे मोठे मोठे आजार उत्पन्न करू शकते. मेद वाढल्याची लक्षणे म्हणजे थोड्याशा कष्टाने थकवा येणे किंवा कधी कधी दम लागणे, नितंब, पोट आणि छाती च्या ठिकाणी शिथिलता (थुलथुलीतपणा) जाणवणे, खूप घाम येणे इ. अशी लक्षणे दिसत असतील तर चिकित्सा अत्यावश्यक आहे. ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर आणखी पुढचे पुढचे आजार होतात ज्यांना दुरुस्त करणे खूप अवघड असते. जेवढ्या लवकर या मेदोरोगावर उपचार करू तेवढ्या लवकर आणि कमी औषधोपचारांनी खूप फरक पडतो. ज्यांना अशी लक्षणे दिसतील त्यांच्यासाठी एक छोटी टीप देऊन ठेवते. १ कप पाण्यात १/२ छोटा चमचा दालचिनी घालून दररोज जेवणानंतर ते पाणी पिणे. हळूहळू मेद कमी होण्यास मदत होईल ….
धन्यवाद.
वैद्य. सौ. मधुरा अतुल भिडे.
एम.डी.(आयुर्वेद)
www.recovalife.com
8380016116
No Comments