वर्षा ऋतु आणि बस्ति

The Recova Thought

वर्षा ऋतु आणि बस्ति

पाऊस सुरु झाला आहेच आणि त्यातून चमचमीत खाण्याची इच्छा ही होतेच. मस्त गरमागरम चहा आणि भजी असं combination खावंसं वाटत नसेल तर नवलच … पण या सगळयाचा आपल्या पोटावर काय परिणाम होत असेल हा विचार केलाय का कधी ? मी डॉक्टर म्हणून नाही विचारत. पण आपल्या भारतीय शास्त्रात सुद्धा तुम्ही बघितलं तर सगळे उपवासांचे दिवस या पावसाळ्यात सांगितले आहेत. उदा; वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, श्रावणातील उपवास इ. हे असे पावसाळ्यांत का असतील असा विचार केलाय का कधी ? श्रावण महिन्यात तर काही लोक नॉन व्हेज खाणं बंद करतात. काही एक वेळ जेवणाचे व्रत करतात. असेच बरेच प्रकारचे उपवास केले जातात.

आयुर्वेद दृष्ट्या या पावसाळ्यात आपल्या शरीरातला जो अन्न पचविणारा अग्नी मंद होतो आणि त्यामुळे भूक पण कमी होते. अग्निच्या क्षमतेच्या मानाने जर जास्त किंवा जड अन्न सतत खाल्ले गेले तर ते व्यवस्थित पचत नाही. आणि तसेच पडून राहते. मला पण पेशंट तपासत असताना सतत हे लक्षात येत असतं की acidity चे पेशंट, मलबद्धतेचे पेशंट, जंतांच्या आजाराचे (कृमि) पेशंट हे या सिझन मध्ये वाढलेले असतात. जवळ जवळ प्रत्येक पेशंटच यातले काही न काही तक्रार घेऊन येतात. ऋतु बदलतो तसा आपला आहार ही बदलणे गरजेचे आहे. बाजारात पालेभाज्या सहज मिळायला लागतात. म्हणून आपण वेळ काळ न बघता त्या खाणे हे योग्य नाही. आयुर्वेदानुसार तर रात्री आणि पावसाळ्यात या अशा पालेभाज्या खाऊ नये असच सांगितले आहे.

माझ्या असं लक्षात आलं आहे कि मी कितीही पेशंट ना हे असले पथ्य सांगितले तरी पेशंट ते पाळतातच असं नाही. लग्न समारंभ, उपवास, जत्रा इ. असे दिवस हल्ली खूप थाटामाटात साजरे केले जातात म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे आहारीय पदार्थांची रेलचेल ठेवली जाते. हल्ली तर उपवासाची थाळी सुद्धा मिळते म्हणे !

एवढा सगळा अत्याचार त्या पोटाने सहन केल्यावर आजार हा होणारच यात वेगळं काही सांगायला नको. आणि हळूहळू पचनाचे आजार वाढायला लागतात. वर्षानुवर्षे हे असंच सगळं चालू असतं. जसं वय वाढत जातं तसे आजार बळकट व्हायला लागतात आणि एका आजारातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे अनेक आजार छान छान मोठी नावं घेत शरीरावर आघात करत घेत असतात. हे सगळं जर नको असेल तर आयुर्वेदात सांगितलेल्या काही नियमांचे पालन केले पाहिजे. ज्यामुळे अनेक आजारांपासून लांब राहता येणं शक्य आहे. सर्व प्रथम जीभेवर कंट्रोल आला पाहिजे. दिवसभरात थोडा तरी व्यायाम/आसने केली पाहिजे. आणि वर्ष ऋतूतील बस्ति चिकित्सा करून घेतली पाहिजे. बस्ती चिकित्सा ही आयुर्वेदानुसार कोणत्याही आजाराची अर्धी चिकित्सा आहे आणि वर्ष ऋतुत जर ती केली तर वर्षभर आपले आरोग्य टिकून राहते. पोटांचे/अन्न पचनाचे आजार हे सहसा होत नाहीत. वजन आटोक्यात राहते. आणि शरीराची रोग प्रतिकारकशक्ति सुद्धा उत्तम राहते.

Madhura Bhide
madhura@recovalife.com
1 Comment
  • Ajay Laxmikant Gokhale
    Posted at 09:51h, 13 July Reply

    Excellent

Post A Comment