वंध्यत्व – एक आयुर्वेदीय दृष्टीकोन

वंध्यत्व – एक आयुर्वेदीय दृष्टीकोन

सुदृढ, निरोगी बाळाला जन्म देणे व आई-वडील दोघांनी मिळून बाळाचे उत्तम संगोपन करण्यातला आनंद व समाधान याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.

पण बरेच वेळा लग्नानंतर तीन-चार वर्ष होऊन सुद्धा गर्भधारणा होत नाही व मग वैद्यकीय मदत घेऊन विविध तपासण्या करून दोष शोधून त्याचे निराकरण केले जाते व गर्भधारणा होते. बऱ्याच वेळा तपासण्या नॉर्मल येतात व सगळे व्यवस्थित असूनही गर्भधारणा मात्र होत नाही. यालाच Unexplained Infertility असे म्हणतात.

लग्नानंतर नवरा बायको एकत्र राहून कुठल्याही संतती नियमन करणाऱ्या गोष्टींचा वापर न करता नियमित संबंध ठेवूनही जेव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा याला प्राथमिक वंध्यत्व म्हणजे Primary Infertility असे म्हणतात व अशा जोडप्यांनी वैद्यकीय उपचार व सल्ला घेण्याची गरज असते.

गर्भधारणा न होण्याची आयुर्वेदामध्ये बरीच कारणे दिली आहेत.

स्त्री व पुरुष दोघांमध्ये असू शकणारे रचनात्मक व क्रियात्मक दोष, मानसिक क्षोभ, शुक्राणू तसेच बीजांड यामध्ये बिघाड असणे.

अयोग्य आहार-विहार, आचार ठेवल्यामुळे शरीरात उत्पन्न होणारे दोष इत्यादी सारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.

आयुर्वेदानुसार गर्भोत्पत्ती ही अनेक अनुकूल समुदायांचा योग्य वेळी व योग्य प्रकारे घडून येणारा संयोग आहे. आयुर्वेदामध्ये यालाच ‘गर्भसंभव सामग्री’ असे नाव दिले आहे.

फक्त स्त्रीबीज व पुरुषबीज यांचा संयोग झाला म्हणजे गर्भोत्पत्ती झाली हा विचार आयुर्वेदाला मान्य नाही. जोपर्यंत शरीर, इंद्रिये, मन व आत्मा हे सगळे योग्यवेळी एकत्र येत नाही तोपर्यंत त्याला जीवन ही संज्ञा मिळत नाही. आत्मा हाही गर्भात गर्भाच्या उत्पत्तीस कारणीभूत आहे. गर्भामध्ये प्रत्ययास येणारे ही चैतन्य आहे ते यामुळेच आहे.

आपण थोडक्यात व सोप्या भाषेत उत्पत्तीसाठी कोणते भाव आवश्यक आहेत ते बघुया.

  • पितृज भाव – दोषरहित शुक्र.
  • मातृज भाव – दोषरहित शोणित.
  • आत्मज भाव – आत्मा व मन यांचा एकत्र प्रवेश.
  • सात्म्यज भाव – गर्भधारणेनंतर गर्भास हितकर आहार विहार ठेवणे म्हणजेच गर्भिणी परिचर्येचे पालन करणे.
  • सत्वज भाव – मानसिक व शारीरिक दृष्ट्या शुद्ध आचार-विचार ठेवणे.
  • रसज भाव – गर्भ वाढीसाठी घेतला जाणारा योग्य आहार.

 फक्त गर्भधारणा होणे इतकेच पुरेसे नसते तर गर्भाची पूर्ण नऊ महिने निकोप वाढ होऊन सुदृढ व निरोगी बाळ जन्माला येणे महत्त्वाचे आहे.

आयुर्वेदात मांडलेला त्रिदोष सिद्धांतही येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. पती व पत्नी यांच्या शरीरात त्रिदोष हे सम अवस्थेत कार्यरत असणे गरजेचे आहे. वात हा दोष या प्रक्रियेत प्राकृत असणे अत्यंत आवश्यक आहे. स्त्रीमध्ये पाळीचे नियमन, बीजांडाचे वहन व गर्भाशयामध्ये गर्भाचे स्थापन करणे ही सर्व महत्त्वाची कामे वायूच्या कार्यक्षेत्रातील आहेत. पुरुषांमध्ये शुक्रवहन व योग्य वेळी होणारे शुक्राचे उत्सर्जन ही कार्येही वायुतत्वाची आहेत. म्हणजेच गर्भधारणेपूर्वी बस्ती हा पंचकर्मातील उपक्रम पती व पत्नी दोघांनी करणे आवश्यक आहे. बस्तीमुळे वायू दोष हा प्राकृत होऊन आपापली कार्ये योग्य पद्धतीने करण्यास सुरुवात करतो. आजकालची जीवनशैली बघता अनियमितपणे पाळी येणे, PCOD च्या तक्रारी अनेक पटींनी वाढलेल्या आहेत. वंध्यत्वाचे प्रमाणही वाढलेले आहे.

म्हणूनच शरीरातील त्रिदोषांचे प्राकृत कार्य होण्यासाठी गर्भधारणेपूर्वी पंचकर्म करून शरीरशुद्धी करणे गरजेचे आहे. वात दोषासाठी बस्ती, पित्त दोषासाठी विरेचन व कफासाठी वमन ही कर्मे करून घेणे गरजेचे आहे. दोषरहित स्त्रीबीज व पुरुषबीज यांच्या संयोगानेच दोषरहित व सुदृढ संतती निर्माण होईल.

तसेच गर्भधारणेसाठी शरीरातील पंचमहाभूते ही आपापली कार्ये योग्य करणे गरजेचे असते.

पृथ्वी – गर्भाला स्थैर्य व आकार मिळतो.

जल – यापासून गर्भाचे पोषण होते.

तेज – गर्भाला चैतन्य देण्याचे काम करतो.

वायु –  गर्भ शरीराचे सूक्ष्म व स्थूल अवयवांचे योग्य चलनवलन करण्याचे काम वायू करतो.

आकाश – गर्भ शरीरातील कर्ण, आमाशय, गर्भाशय अशा अवयवांच्या वाढीचे काम आकाश तत्वाचे आहे.

त्यामुळेच आयुर्वेदानुसार केवळ स्त्री व पुरुष हे दोघेच गर्भधारणेसाठी गरजेचे नसतात. असे असेल तर प्रत्येक जोडप्याला अपत्यप्राप्ती झाली असती. पण तसे दिसत नाही. तर आपण पाहिलेच की योग्य गर्भधारणा होण्यासाठी अनेक गोष्टींचा संयोग होणे आवश्यक आहे.

म्हणूनच आयुर्वेदाने गर्भधारणेपूर्वी औषधे व पंचकर्माने शरीरभाव प्राकृत करून घेऊन मगच गर्भधारणेचे यथायोग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच एकदा गर्भधारणा झाली की गर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी गर्भिणी परिचर्येचे  यथायोग्य पालन हे तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने करणे गरजेचे आहे. गर्भिणी परिचर्येमध्ये कुठल्या महिन्यात गर्भाच्या कुठल्या अंगप्रत्यंगाची वाढ होते. त्यानुसार आहार-विहार व उपचार यांची उपाययोजना केली आहे.

 

डॉ. मधुरा अ.  भिडे.

(एम.डी आयुर्वेद)

www.recovalife.com

8380016116

 

Madhura Bhide
atul@recovalife.com
No Comments

Post A Comment