सुप्रजेसाठी केले जाणारे गर्भसंस्कार (समज/गैरसमज)

सुप्रजेसाठी केले जाणारे गर्भसंस्कार (समज/गैरसमज)

गर्भसंस्कार हा शब्द आता सगळ्यांच्या चांगलाच परिचयाचा झाला आहे.  गर्भावर केले जाणारे संस्कार इतका अर्थ त्यातून अभिप्रेत होत असला तरी खरंच नक्की कोणते संस्कार? हे शास्त्रोक्त आहे का? खरंच याचा फायदा होतो का? त्याचे महत्त्व काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात सुदृढ व निरोगी प्रजा म्हणजेच सुप्रजा निर्माण होणे ही काळाची गरज बनली आहे. आपली जीवनशैली ही गेल्या 20-25 वर्षांत खूप बदललेली आहे.  त्याचे दुष्परिणाम हे आपल्या आरोग्यावर दिसू लागले आहेत. ज्या मुलामुलींचे मुळातच आरोग्य नीट नसेल त्यांची संतती ही निकोप कशी निपजेल? हा प्रश्न मोठा आहे. मुळातच प्रत्येक जोडप्याला एकच आणि फारतर दोन अपत्ये हवी असतात. ती अपत्ये सुदृढ, निरोगी व कुठलेही व्यंग नसणारी असावीत. अशीच प्रत्येक पालकाची इच्छा असणार व इथेच गर्भसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित होते.

गर्भिणी परिचर्या व त्या अनुषंगाने गर्भाचा शारीरिक व बौद्धिक विकास कसा साधावा याचे अगदी विस्तृत विवेचन आयुर्वेदामध्ये आले आहे. गर्भसंस्कार हे पूर्णपणे विज्ञानाधिष्ठित व शास्त्रीय आहेत यात शंकाच नाही. गर्भावस्थेमध्ये गर्भिणीचा आहार, विहार(शारीरिक व मानसिक), व संस्कार या 3 गोष्टींचे जाणकार वैद्याकडून पूर्ण नऊ महिने मार्गदर्शन घेतल्यास सुप्रजा नक्कीच निर्माण होईल.

सुप्रजा निर्मितीची सुरुवातच मुळात गर्भधारणेच्या आधी पासूनच होते. जसे चांगले पीक येण्यासाठी ऋतु, जमीन व बी-बियाणे अगदी उत्कृष्ट असणे गरजेचे असते. अगदी त्याचप्रमाणे निकोप गर्भासाठी क्षेत्र (स्त्री गर्भाशय), बीज (आर्तव व शुक्र) तसेच योग्य ऋतुकाळ (मासिक पाळी) या सर्व गोष्टी प्राकृत असणे व त्यांचा योग्य पद्धतीने प्रयोग होणे गरजेचे असते.

म्हणूनच गर्भधारणेपूर्वी वैद्याच्या सल्ल्याने योग्य ती पंचकर्म करून शरीरशुद्धी करून घेणे हे स्त्री व पुरुष दोघांनाही गरजेचे आहे. त्यातही स्त्रियांच्या आरोग्याचा प्राधान्याने येथे विचार करणे गरजेचे आहे. कारण जन्मतःच सदोष मुले जन्माला आली तर त्यात आई-वडिलांची दोघांची जबाबदारी असली तरी मातेची जबाबदारी अधिकच आहे. हा विचार डोक्यात ठेवूनच स्त्री व गर्भ यांच्यावरच लक्ष केंद्रीत करणे गरजेचे वाटल्याने आम्ही सुप्रजा निर्मितीसाठी गर्भसंस्कार (Pregnancy Wellness through Ayurved) ही संकल्पना घेऊन येत आहोत.

यामध्ये गर्भधारणेपूर्वी पासून शरीरशुद्धीसाठी औषधे व काही पंचकर्मे यांची प्रकृतीप्रमाणे उपाय योजना केली जाते. एकदा गर्भधारणा झाली की प्रत्येक महिन्यात गर्भाचा कसा विकास होतो त्याप्रमाणे आयुर्वेदाने कोणत्या महिन्यात कुठली वनस्पतिज औषधे घ्यावीत, कोणता आहार घ्यावा, विहार कसा असावा हे सांगितले आहे, यालाच गर्भिणी परिचर्या असे म्हणतात. आहार, विहार उपचार या त्रिसूत्रांवर गर्भाचा सर्वांगाने विकास साधला जातो. पुढची पिढी निकोप निपजण्यासाठी, सक्षम होण्यासाठी या गर्भिणी परिचर्येचा अवलंब करणे ही आजच्या परिस्थितीत काळाची गरज बनली आहे.

उत्तम संतती होण्यासाठी गर्भधारणेच्या आधीपासूनच ते मूल जन्माला येईपर्यंत आयुर्वेद शास्त्राची कास धरणे अत्यंत हितकारक ठरते.

अधिक माहिती पुढील लेखात …..

 

डॉ. मधुरा अ.  भिडे.

(एम.डी आयुर्वेद)

www.recovalife.com

8380016116

Madhura Bhide
atul@recovalife.com
No Comments

Post A Comment