
25 Mar पथ्य – अपथ्य विचार
आयुर्वेद हे मानवाच्या आयुष्याचा सर्व दृष्टिकोनातून विचार करणारे उत्तम शास्त्र आहे. शरीराची कार्ये प्राकृतावस्थेत राहावीत म्हणूनही रुग्णांना औषध दिले जाते, विकृतींमुळे बिघडलेले कार्यही औषधोपचाराने पूर्ववत केले जाते व पुनः विकृती होऊ नये म्हणूनही औषधोपचार केले जातात. पण हे सर्व करताना जर पथ्याची म्हणजे आहाराची योग्य रचना केली गेली नसेल तर चिकित्सेचा तितकासा उपयोग होत नाही. कारण निदान (कारण) परिवर्जनानेच आजार बरा होतो. अनेक रोगांचे प्रमुख कारण आहाराची चुकीची योजना हेच असते.
आहाराचा अयोग, अतियोग किंवा मिथ्यायोग तीनही त्रासदायकच असतात. शरीर व आहारद्रव्ये ही पंचमहाभूतापासून बनलेली आहेत. शरीराचे पोषण किंवा शरीरास रोगग्रस्त करणे या दोन्ही गोष्टी आहाराचे अधीन आहेत. शरीररूपी मार्गास जे अपकारक नाही व मनास जे प्रिय आहे ते सर्व पथ्य समजावे.
जे शरीरास व मनास अपकारक ते सर्व अपथ्य समजावे. जसे – दही रात्रीच्या वेळी खाऊ नये. गरम करून खाऊ नये, नित्य सेवन करू नये, अन्यथा अग्निमंद होतो आणि कफाचा प्रकोप होतो. एकदा जेवल्यानंतर पुन्हा लगेच जेवणे याला अध्यशन म्हणतात. एकदा जेवल्यानंतर तीन ते चार तास काहीही खाऊ नये. आणि सहा – सात तासांपेक्षा उपाशी राहू नये. अतिमात्रेत सेवन केलेला आहार शारीरिक दोषांचा प्रकोप करवितो. त्यामुळे अन्न वहनात व अन्न पचनात अडथळा निर्माण होतो.
भूक लागलेली नसताना ही केवळ जेवणाची वेळ आली म्हणून जेवणे अशा वेळेस अन्न अपाचित अवस्थेतच पडून राहते. आणि याउलट म्हणजे भूक लागली असता न जेवणे म्हणजे अॅसिडिटी ला आमंत्रणच. भूक नसताना भोजन अतिमात्रेत घेणे अतिशय चुकीचे ठरते. याप्रकाराने अजीर्ण होते.
पूर्ण पचन झालेला आहार हा आयुष्याची वृद्धी करतो. उष्ण अन्न खावे, योग्य मात्रेत खावे, घाईघाईत जेवू नये; न बोलता जेवणे, मनःपूर्वक खावे, नातिविलंबाने खावे. हितकर पदार्थांचे सेवन किंवा अहितकर वस्तूंचा त्याग एकदम करू नये.
विरुद्धाहार म्हणजे दोन प्रकारचे आहारीय पदार्थ जे परिणामतः (पचन झाल्यानंतर) विरुद्ध असतात. उदा; दूध आणि मासे एकत्रित खाल्ल्याने कुष्ठरोग होतो. दूध-दही-ताक-केळी यापैकी कोणताही पदार्थ एक दुसऱ्यासह खाऊ नये. अशा प्रकारच्या अन्न पदार्थांनी रक्तविकृति होते आणि तारुण्यपीटिका (Pimples, Acne) सारखे आजार निर्माण होतात. उपवास हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आयुर्वेद शास्त्रात लंघन आणि अनशन अशी नावे आहेत. राजगिरा, मूग, साळीच्या लाह्या, गोड फळे, दूध हे पदार्थ उपवासासाठी चांगले पदार्थ आहेत. काही आजारांमध्ये सुद्धा लंघन करण्यास सांगितले आहे. उदा; ज्वर, कुष्ठरोग, मेदोवृद्धी इ.
काही पदार्थ सदा पथ्यकर असतात. जसे लालसाळी, तांदूळ, मूग, सैधव, गाईचे दूध, तूप, आले आणि मनुका. काही पदार्थांच्या पाक क्रिया आयुर्वेदात दिल्या आहेत. त्यातील काही इथे सांगते –
तक्र (ताक) – दह्यामध्ये ४ पट पाणी घालून त्यास घुसळावे त्यास तक्र असे म्हणतात.
यूष (सूप/कढण) – आयुर्वेदात यूष हे कडधान्य शिजवून करण्यास सांगितले आहे. उदा; मूगाबरोबर १६ पट पाणी घालून शिजवणे. नंतर गाळून घेणे आणि फोडणी देणे.
मांसरस – मांसखंड १ भाग आणि ६४ भाग पाणी एकत्र करून शिजवणे व एक चतुर्थांश उरविणे. म्हणजे मांसरस तयार होतो. याला फोडणी दिली तरी चालते.
– डॉ. सौ. मधुरा भिडे.
No Comments