केसांना तेल लावण्याचे महत्त्व

केसांना तेल लावण्याचे महत्त्व

            हल्लीच्या काळात डोक्याला तेल लावणे हे कालबाह्य झालं आहे. कोणत्याही Hero किंवा Heroine ने केसांना तेल लावायला सुरुवात केली असं कळले तर लगेच आपल्याकडे सगळेजण केसांना तेल लावायला लागतील.
            आयुर्वेदाने सांगितले आहे की, “अभ्यंगं नित्यं आचरेत् |” अर्थात रोज शरीराला तेल लावणे. जेणेकरून आपले आरोग्य छान राहील.
आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपले केस घनदाट, Silky, लांबलचक असावेत. पण त्यासाठी थोडी काळजी घेणे गरजेचे असते. लहानपणी आईच्या हट्टापायी आपण डोक्याला तेल लावून घ्यायचो. पण आता हे सगळं Out of fashion झाल्यामुळे केसांचे आजार वाढायला लागले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने केस गळणे आणि अकाली पांढरे होणे या तक्रारी जास्त दिसून येत आहेत.
आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपण डोक्याला तेल लावणे इतका पण वेळ काढू शकत नाहीये. काही शास्त्रज्ञांचे तर असे म्हणणे आहे की हळूहळू मनुष्याची जशी शेपूट निघून गेली तसे केस सुद्धा निघून जाणार. अर्थात या सगळ्याला बरीच तपं ओलांडावी लागणार. दिवसभर A.C. मध्ये काम करणे, फास्टफूड अति खाणे, जेवणाच्या अनियमित वेळा, झोपेच्या वेळा अनियमित असणे, चमचमीत पदार्थ सतत खात राहणे, भरपूर प्रवास करणे, सतत चिडचिड करणे किंवा Stress मध्ये असणे या सर्व कारणांनी केसांच्या ठिकाणी रुक्षता येते आणि मग कालांतराने केस गळायला लागतात. आधी सुरुवातीला १०-१५ केस गळतात तेव्हा आपण दुर्लक्ष करतो. हळू हळू कारणे आणखी वाढत जातात आणि केस गळणे पण वाढत जाते.
             केसांच्या त्वचेला जेव्हा रुक्षता येते तेव्हा पोषण कमी होतंय हे पण लक्षात ठेवायला हवे.
आयुर्वेदाने या अशा लक्षणांवर मात करण्यासाठीच शिरोऽभ्यंग सांगून ठेवला आहे. एखाद्या झाडाच्या मुळाशी पाणी घातल्यास जसं ते झाड छान वाढतं, तसंच डोक्याला/केसांना नेहमी तेल लावल्यास केसांच्या त्वचेची रुक्षता कमी होते आणि केस गळणे कमी होतं.
आता याच बरोबर पोषण सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे चांगला सकस आहार आणि वेळेवर झोपणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
केसांची योग्य वाढ होण्यासाठी केसांच्या मुळाशी तेल लावणे गरजेचे आहे. केसांना मऊ ठेवण्यासाठी केसांना त्यांच्या पूर्ण लांबीपर्यंत तेल लावणे आवश्यक आहे. ज्यांना केसांच्या समस्या आहेत त्यांनीच फक्त तेल लावायचे असे नसून सगळ्यांनीच तेल लावणे खूप आवश्यक आहे.
               डोक्याला तेल लावल्याने फक्त केसांना फायदा होतो असं नाही तर डोळ्यांचे, कानाचे आरोग्य पण टिकून राहते. त्याचबरोबर डोकं शांत राहतं आणि झोप पण छान लागते.
                लहानपणापासूनच सवय लावली तर छान उपयोग होतो. केसांना चमक येते.
                दुभंगलेल्या (Split ends) केसांच्या मुळाशी तेल लावणे खूप गरजेचे आहे. केस अधिक काळ काळे राहतात. म्हणजे केसांचे ageing होत नाही. हे सगळे उपयोग नित्य तेल लावले तरच होतात.
                प्रत्येकाच्या प्रकृतिनुसार केसांची पण प्रकृति असते . जसे काहींचे केस कुरळे तर काहींचे सरळ. काहींचे काळे तर काहींचे पिंगट असे बरेच प्रकार जन्मापासून दिसतात. त्यामुळे प्रत्येकाला सगळीच तेलं चालतात असे नाही. त्यातल्या त्यात खोबरेल तेल चांगले. थोडे कोमट करून रोज लावले तर चांगले. पुढे जाऊन जेव्हा केसांच्या तक्रारी असतील तर कोणते तेल चांगले हे वैद्य ठरवू शकतात.
                 वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली तेल वापरल्यास लवकर उपयोग दिसून येतो. बाजारात अनेक तेलं उपलब्ध आहेत. पण कोणते आपल्या केसांसाठी उपयोगी आहे हे वैद्यांच्या मार्गदर्शनाने वापरले तर पैसाही वाचतो आणि वेळही वाचतो. हे लक्षात ठेवायला हवे.
                 आयुर्वेदात तिळ हे केसांसाठी उपयुक्त असे सांगितले आहे. म्हणून तिळाचे तेल वापरले तरी चालते. वेगवेगळ्या वनस्पतींनी सिद्ध तिळाचे तेल वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या तक्रारी मध्ये वापरता येते. पण योग्य मार्गदर्शन असेल तर ही सगळी तेलं अपाय न करता उपाय करून देतात. डोक्यावरचे केस टिकवायचे असतील तर अशा प्रकारची थोडी तरी काळजी घेतली पाहिजे ना !

तसंच आमचा रेडिओ वरील कार्यक्रम सुद्धा ऐका या कार्यक्रमाचे काही भाग आम्ही आमच्या Recovalife च्या Fb page आणि Youtube चॅनेलवर सुद्धा प्रसारित करत असतो. तुम्हाला आवडल्यास तुम्ही शेअर सुद्धा करू शकता.
धन्यवाद.
डॉ. मधुरा भिडे
एम. डी. (आयुर्वेद)
८३८००१६११६/११९
www.recovalife.com

Madhura Bhide
atul@recovalife.com
No Comments

Post A Comment