आयुर्वेद आणि आहार भाग – २ (Ayurvedic Diet)

The Recova Thought

आयुर्वेद आणि आहार भाग – २ (Ayurvedic Diet)

आहार किती घ्यावा याविषयीही आयुर्वेदाने विचार केला आहे. आपल्या आहाराच्या क्षमतेपेक्षा एक चतुर्थांश कमी खाल्ले पाहिजे. पूर्ण पोटभर जेवल्यामुळे अन्नपचनासाठी पुरेशी जागा शिल्लक राहत नाही. जेवताना खूप घाईघाईने जेवणेही प्रकृतीसाठी चुकीचे असते. पहिला घास तोंडात गेला की तो चावत असतानाच लाळ मिसळली जाऊन त्या अन्नाच्या पचनाची प्रक्रिया सुरू होते. ते अन्न पोटात पोहोचले व पचनक्रिया नीट सुरू झाली की मेंदूला संदेश जातो. ज्या व्यक्ती भरभर जेवतात त्यांचे पोट प्रत्यक्षात लवकर भरते पण अन्न पचनाची प्रक्रिया ठरावीक वेळानंतर पुरेशी सक्रिय होत असल्याने मेंदूकडून खाणे थांबवण्याचा संदेश उशिरा येतो. तोपर्यंत खाण्याची क्रिया चालूच राहते. म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न पोटात जाते. अतिखाण्यामुळे वजन वाढते. यामुळे सावकाश खाणे खूप महत्त्वाचे आहे.

एकदा पोटभर जेवल्यावर थोड्या थोड्या वेळाने परत खाणे आयुर्वेदानुसार चुकीचे आहे. त्याला ’अध्यशन’ असे म्हटले आहे. अधिक अशन म्हणजे सारखे सारखे खाणे. यामुळे विविध प्रकारच्या व्याधी, आजार
होऊ शकतात.

सध्या आपल्या आहाराच्या पद्धतीही अतिशय चुकीच्या झाल्या आहेत. आयुर्वेदाने जसे जेवणात सहा रस असावेत असे सांगितले आहे तसे ते कोणत्या क्रमाने खावेत हेही सांगितले आहे. जड अन्न, जास्त पाणी असलेले, खूप गोड किंवा खारट असलेले पदार्थ जेवणाच्या सुरुवातीस आधी खावेत असे आयुर्वेद म्हणतो. मात्र सध्या आपण स्वीट डीश, डेझर्ट किंवा फळे जेवणानंतर खातो. त्यात आपली जीवनशैली बैठी व व्यायाम नसलेली झाली आहे. त्यामुळे जेवणानंतर खाल्लेली स्वीट डीश पचत नाही. भातामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तोही जेवताना आधीच खावा. आपल्या पारंपरिक भोजनसंस्कृतीतही वरणभात आधीच खायची पद्धत आहे. त्यानंतर गोड पदार्थ, पोळी, भाजी खावी व सर्वांत शेवटी पचण्यास हलके असलेले ताक प्यावे. भात, वरण, मीठ व लिंबू हे एकत्र खाल्ले जाते त्याचीही उपयुक्तता आता आधुनिक संशोधकांना जाणवली आहे. कारण कार्बोहायड्रेट, फॅटस्, प्रोटीन्स आणि ऍसिटिक ऍसीड हे जेव्हा एकत्र होते तेव्हा त्याचे पचन उत्तम होते.

आहार कधी घ्यावा, जेवणाची वेळ कोणती असावी याविषयीही आयुर्वेदात स्पष्ट मार्गदर्शन आहे. अग्नी ही आयुर्वेदामध्ये संकल्पना आहे. आपल्या अन्नाचे पचन करण्याचे काम शरीरातील अग्नी करतो. सूर्य आणि शरीरातील अग्नी यांचा थेट संबंध असतो. त्यामुळे दुपारचे जेवण डोक्यावर सूर्य असताना म्हणजे दुपारी बारा ते एकच्या सुमारास घ्यावे. यावेळी अग्नी चांगला प्रज्वलित असल्यामुळे आहाराचे प्रमाण व्यवस्थित असावे. शरीरातील अग्नी संध्याकाळी सूर्योदयानंतर मंद असतो त्यामुळे हलका व कमी आहार घ्यावा. खूप उशिरा जेवू नये. उशिराचे जेवण व त्यात पचनास जड पदार्थांचा समावेश हे सध्या सामान्य चित्र दिसून येते. कामावरून उशिरा घरी येणे, टि.व्ही.वरील कार्यक्रम, पार्ट्या, रिसेप्शन यामुळे जेवणास वारंवार खूप उशीर होतो. तसेच अशा जेवणात पनीर, छोले, चायनीज, गोड पदार्थ यांचा बहुधा समावेश असतोच. उशिरा जेवून लगेच झोपले जाते. त्यामुळेही हे अन्न पूर्णपणे पचत नाही आणि पचनविषयक अनेक आजार अनेकांना झालेले दिसून येतात.

जेवण कुठे घ्यावे, स्वयंपाक तयार करताना स्वच्छता कशी महत्त्वाची आहे, जेवताना वातावरण व मनःस्थिती कशी असली पाहिजे याविषयीही आयुर्वेदाने मार्गदर्शन केले आहे. जेवताना देवाचे, स्वयंपाक करणार्‍याचे, अन्न पिकवणार्‍यांचे स्मरण करावे असेही सांगितले आहे. गप्पा, वादविवाद, टि.व्ही, कॉम्प्युटर अशा गोष्टींसोबत जेवणे चुकीचे आहे.

विरुद्ध अन्न ही आयुर्वेदातली एक महत्त्वाची संकल्पना आहे. यामुळे मुख्यतः त्वचेचे आजार जास्त प्रमाणात होतात. फळे आणि दूध हे एकत्र खाणे (शिक्रण, फ्रूट सॅलड) किंवा मांसाहार व दुधाचे पदार्थ एकत्र खाणे (चिकन बिर्याणीमध्ये दही घालणे) ही विरुद्ध अन्नाची ठळक उदाहरणे आहेत. दही आणि पापड एकत्र खाण्याची सध्या चुकीची पद्धत सुरू आहे. या सर्वांमुळे पदार्थाची चविष्ट होत असले तरी पचनाच्यासाठी अडचण तयार होते. पचन न झाल्याने रक्तामध्ये दोष निर्माण होतात व त्यातूनच पुढे त्वचाविकार होतात. त्यामुळे विरुद्ध अन्न न घेणे ही त्वचाविकारांमधून मुक्त होण्यासाठी पहिली पायरी असते. दही आणि मिठाचा अतिरेकही आहारात नसावा.

आहारामध्ये पाणी हा देखील महत्त्वाचा घटक आहे. याविषयी अनेक मते व गैरसमज आहेत. जेवणा आधी जास्त पाणी पिणे अयोग्य आहे कारण त्यामुळे अन्न कमी जाते. जेवताना वारंवार पाणी पिणे चुकीचे आहे व जेवल्यानंतर एकदम पाणी पिणे चुकीचे आहे. यामुळे अन्नपचन बरोबर होत नाही. आहारात खूप पाणीदार पदार्थ असतील तर जेवताना पाणी कमी प्यावे. जेवताना कोमट पाणी प्यायल्यास ते पचनास मदत करणारे असते. तोंडात ओलसरपणा राहील एवढेच थोडे पाणी जेवताना प्यावे. सामान्यपणे तहान लागली की थोडे पाणी सावकाश प्यावे असे सांगितले जाते. हे नियम आरोग्यसंपन्न व्यक्तीसाठी आहेत. आजारी व्यक्तीस रोगानुसार वेगळी पथ्ये असतात.

सर्वांत शेवटी साररूपामध्ये आहाराविषयीचे महत्त्वाचे नियम सांगायचे झाले तर आहार हा योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य प्रकारचा, घरी तयार केलेला, सहा रसांचा समावेश असलेला असावा. तो शांतपणे बसून, जेवणावर लक्ष केंद्रित करून केला जावा. आपण खात असलेल्या पदार्थांचे दृश्य स्वरूप, स्पर्श, वास, चव या सर्वांची अनुभूती घेत आहार घेतल्यास मेंदूला योग्य संदेश जाऊन आहार पचवणार्‍या रसांची निर्मिती योग्य प्रकारे होते व अन्नामुळे शरीराचे योग्य पोषण होते.

– डॉ. सौ. मधुरा भिडे

Madhura Bhide
madhura@recovalife.com
5 Comments
  • Asmita Mohan More
    Posted at 14:16h, 01 May Reply

    Excellent information. Thanks.
    Necessary for everyone.

  • Bhushan Thatte
    Posted at 14:38h, 01 May Reply

    खरे तर, आत्तापर्यंत किती विरोध अन्न जेवत होतो ते समजले नव्हते. आणि मुख्य म्हणजे माझे आजार यातूनच उद्भवले आहेत हे आत्ता समजले.
    अतिशय महत्वाच्या माहिती करता धन्यवाद…

  • Vijay Vaidya
    Posted at 16:00h, 01 May Reply

    खूप छान माहिती थोडक्या शब्दात मांडली आहे .आहाराचे महत्व सुंदररित्या मांडले आहे .आजून अनेक आहार विषयक गोष्टी आपल्या कडून कळतील हि अपेक्षा..
    धन्यवाद….
    वाचक
    विजय वैदय…

  • S Amrita Bokil
    Posted at 10:41h, 02 May Reply

    Nice info…

Post A Comment