आयुर्वेद आणि आहार भाग – १ (Ayurvedic Diet)

The Recova Thought

आयुर्वेद आणि आहार भाग – १ (Ayurvedic Diet)

मानवी जीवनाचे तीन महत्त्वाचे भाग (उपस्तंभ) असतात असे आयुर्वेद मानतो. आहार हा त्यातला सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आयुर्वेदाने आहाराविषयी सखोल असा अभ्यास केला आहे. माणसाच्या स्वास्थ्यामध्ये आहाराचे स्थान महत्त्वाचे आहे. ‘अष्टौ आहार विधी विशेषायतन’ असे आयुर्वेदामध्ये आहाराविषयी म्हटले आहे. म्हणजे आहार घेताना तो आठ पद्धतींनी घ्यावा असे आयुर्वेदाला अपेक्षित आहे. उदा – काय खावं, काय खाऊ नये, किती प्रमाणात खावं, जेवताना कसं बसावं, आहारात पदार्थ काय असावेत, त्यामध्ये किती रसांचा (कडू, तुरट, गोड, खारट अशा चवींना आयुर्वेदात रस असे म्हटले जाते.) समावेश असावा या गोष्टी यामध्ये येतात.

एखादी व्यक्ती आजारी झाली तर त्याच्या कारणांमध्ये आहारविषयक चुका हे सर्वांत जास्त असण्याची शक्यता असते. प्रत्येक आजाराविषयी सांगताना आयुर्वेदात सविस्तर वर्णन करण्यात आले आहे की कोणत्या प्रकारच्या आहारामुळे कोणता आजार होतो. त्याचप्रमाणे आहारात घेतल्या जाणार्‍या प्रत्येक पदार्थाविषयी आयुर्वेदाने अभ्यास करून त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. एखादा पदार्थ कुठल्या ठिकाणी (आयुर्वेदातील संज्ञा – देश) कोणत्या ऋतूमध्ये तयार झाला आहे, त्यानुसार त्याचे गुणदोष बदलतात. उदाहरणार्थ एखादे केळ्याचे झाड खूप पाणी असलेल्या जमिनीत असेल तर त्याला येणार्‍या केळ्याचे गुणधर्म हे जंगलात (खूप झाडे असलेल्या जमिनीत) असलेल्या केळ्याच्या झाडाच्या केळ्यापेक्षा खूप वेगळे असतात. खूप पाणथळ भागात किंवा जमिनीत खूप प्रमाणात पाणी असलेल्या ठिकाणी तयार झालेल्या पदार्थाचा कफावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. पाण्यातील वनस्पतीमध्येही चिखलात उगवणारी वनस्पती व स्वच्छ पाण्यात उगवणारी वनस्पती यांच्या गुणधर्मामध्ये व त्यांच्या आहारातील समावेशामुळे स्वास्थ्यावर होणार्‍या परिणामांमध्ये खूप फरक असतो. त्यामुळे त्यांचे वेगवेगळे सविस्तर वर्णन आयुर्वेदात केले आहे. त्यामुळे असा पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ला गेला तर प्रकृती सुधारते आणि अयोग्य प्रमाणात खाल्ला तर प्रकृती बिघडते. एवढेच नव्हे तर या अन्नपदार्थांची कोणत्या कालावधीत लागवड करावी, कधी पीक कापावे आणि कधी त्याचा आहारात समावेश करावा म्हणजे त्यात सर्वोत्तम गुण असतात याबद्दलही आयुर्वेदामध्ये अभ्यास, संशोधन व मार्गदर्शन केले आहे.

षडरस आहार – आहारामध्ये सहा रसांचा समावेश असावा असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे. म्हणजेच गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट आणि कडू अशा चवी आपल्या आहारात योग्य प्रमाणात असल्याच पाहिजेत. ज्याप्रमाणे आपले शरीर पंचमहाभूतांचे बनलेले असते त्याप्रमाणे वरील प्रत्येक रसामध्ये पंचमहाभूतांचे संघटन असते. त्यामुळे हा प्रत्येक रस आहारातून आपल्या शरीरात जातो तेव्हा तो शरीरातील प्रत्येक अवयवाचे पोषण करतो. त्यामुळेच आहारात यापैकी एखादा रस कायमच नसला किंवा अत्यल्प प्रमाणात असला तर शरीराचे पोषण योग्यपणे होत नाही व आजार उत्पन्न होतो. तसेच एखादा रस अति प्रमाणात, वारंवार आहारात असेल तरीसुद्धा पंचमहाभूतांचे संतुलन ढळून आजार निर्माण होतो. हा सिद्धांत समजण्यासाठी एक उदाहरण घेता येईल. काही व्यक्तींना रोज जेवताना लोणचे खाण्याची सवय असते. हे लोणचे जरुरीपेक्षा जास्त खाल्ले गेले तर प्रकृतीसाठी अपायकारक ठरते. कारण लोणच्यामध्ये ते टिकण्यासाठी जास्त प्रमाणात मीठ घातलेले असते. म्हणजेच जास्त लोणचे रोज खाणार्‍या व्यक्तीच्या आहारात खारट रसाचे प्रमाण जास्त असते. अशा व्यक्तींना त्वचा विकार, त्वचा अकालीच सुरकुतणे, केस गळणे, लवकर पांढरे होणे, लवकर चष्मा लागणे अशा त्रासांना बळी पडावे लागते. त्यामुळे आहारात सहा रसांचे किती प्रमाण असावे याविषयी आयुर्वेदात संशोधन केलेल्या शास्त्रकारांनी विविध ग्रंथांमध्ये या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. काय खाल्ले तर त्याचा शरीरावर चांगला-वाईट परिणाम होतो. कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीने कोणता रसात्मक आहार घेऊ नये. प्रत्येक व्यक्तीचा जन्म होण्याआधी गर्भ अवस्थेत त्यावर जे संस्कार झाले असतात किंवा वात, पित्त, कफ या दोषांचे जे संघटन त्याच्या शरीरात झाले असते त्याला त्या व्यक्तीची प्रकृती (कॉन्स्टिट्युशन) असे म्हणतात. या ठिकाणी दोष म्हणजे रूढ अर्थाने त्रुटी किंवा कमतरता असे न घेता मूलभूत घटक या आयुर्वेदीय अर्थाने दोष हा शब्द घेतला पाहिजे. हे तीनही दोष शरीरामध्ये कार्यरत असतात पण जन्म घेताना शरीरात त्यांपैकी ज्या दोषाचे आधिक्य असते ती त्याची प्रकृती असे म्हटले पाहिजे. मात्र सर्वसाधारणपणे याविषयी उलट व चुकीचे बोलले जाते. बोलताना जेव्हा असे म्हटले जाते की, मला खूपवेळा सर्दी होते त्यामुळे माझी प्रकृती कफाची आहे. हे चुकीचे आहे. प्रकृती ही शरीराला पोषण करणारी असते तर विकृती ही शरीराला घातक असते.

प्रत्येक पदार्थ, प्रत्येक रस हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. तिखट (आयुर्वेद : कटू रस) रसामध्ये तेज आणि वायू या महाभूतांचे प्राबल्य असते. बाकीची तीन महाभूतेही त्यात असतात पण त्यांचा प्रभाव कमी असतो. तेज आणि वायूमुळे शरीरातील पित्त वाढते. त्याचे पोषण होते. शरीरात पित्त जागृत राहण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते. तेज आणि वायू ही महाभूते या इंधनाचे काम करतात. त्यामुळे आहारात थोड्या प्रमाणात तिखट रस असणे गरजेचे आहे. मात्र यामध्ये अतिरेक झाला तर विकृती किंवा आजार निर्माण होतो. उदाहरणार्थ पित्त प्रकृतीच्या माणसाने रोज खूप प्रमाणात तिखट, मसालेदार, चमचमीत, तळलेले अन्न (बहुतेकवेळा बाहेर विकत घेतलेले पदार्थ या प्रकारचेच असतात.) खाल्ले तर शरीरातील पित्ताचे पोषण न होता त्याला पित्ताचे विविध त्रास होणार आहेत. मग अशा व्यक्तीवरील उपचारही अवघड होऊन बसतात. कारण त्या व्यक्तीची पित्त प्रकृती जपायची असते आणि त्याचवेळी निर्माण झालेली विकृती नष्ट करायची असते. मग अशा व्यक्तीला पित्तमारक औषधयोजना न करता पित्तशामक औषध दिले जाते. पित्ताचे शमन करणारा मधुर रसात्मक आहार करायला सांगितले जाते. आहारात ताकाचा समावेश करायला सांगितला जातो. मात्र हे ताक ठरावीक प्रकारचे असणे गरजेचे असते. म्हणजे ताज्या दह्याचे, दह्यापेक्षा आठपट पाणी घालून तयार केलेले, मीठ किंवा इतर मसाला नसलेले असे असले पाहिजे. तसेच ते जेवताना पोटात गेले पाहिजे. एखाद्या कफ प्रकृतीच्या रुग्णाला सर्दी, सायनस असा कोणता कफाचा आजार झाला असेल तर त्याच्या आहारामध्ये थंड तापमान असलेले पदार्थ, दही, शिळे अन्न, दुधाचे पदार्थ, भातासारखे खूप पाणीदार पदार्थ नसावेत. कारण या पदार्थांना कफ विकृतीकारक आहार म्हटले जाते. असा आहार कफ प्रकृतीच्या माणसाने घेतल्यास त्यामुळे रोग तयार होतो. हा रोग बरे करणे, एखादी पित्त किंवा वात प्रकृतीची व्यक्ती असा आहार घेतल्याने आजारी झाली तर तिच्या उपचारांपेक्षा कठीण ठरते. याचे महत्त्वाचे कारण असे की कफ प्रकृतीचा स्वभाव सहसा आराम करण्याचा, व्यायाम-अंगमेहनत टाळण्याचा असतो. त्याला दुधाचे पदार्थ, थंड पदार्थ असा आहार निसर्गतःच आवडत असतो. त्याने ते अल्पप्रमाणात घेतल्यास त्याच्या प्रकृतीचे पोषण करणारे असते पण ती मर्यादा राखली जात नाही. त्यामुळे निसर्गतः त्याला आवडणार्‍या आहारावर नियंत्रण राखणे, विहारामध्ये स्वभावाविरुद्ध बदल करणे त्याला जड जाणार असते. त्यामुळे अशा व्यक्तींचे उपचार करणे कठीण असते.

कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीने कोणत्या ऋतू मध्ये कोणता आहार घ्यायचा याविषयीही आयुर्वेदामध्ये सविस्तर मांडणी केली आहे. उदाहरणार्थ – कफ प्रकृतीच्या व्यक्तीने हिवाळ्यामध्ये खूप उष्ण पदार्थ खायचे नसतात तर आपल्याला सहन होतील असे कोमट पदार्थ आहारात असले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीला थंडीच्या दिवसांमध्ये दम्याचा त्रास असेल तर त्या व्यक्तीने उष्ण पदार्थ खावेत असे सांगितले जाते. येथे उष्ण म्हणजे स्पर्शासाठी उष्ण नसून ज्या रसांमध्ये उष्ण भावना आहे असे रस असलेला आहार घेतला पाहिजे. तिखट, आंबट व खारट या रसांना उष्ण रस म्हटले जाते. त्यामुळे कफामुळे तयार झालेल्या दम्याचा त्रास असे रस असलेला आहार हिवाळ्यामध्ये संध्याकाळी घेतला असता तो आजार कमी होतो. त्यामुळे प्रकृती आणि ऋतू यांचे आहारात व पर्यायाने आरोग्यामध्ये महत्त्व आहे.

– डॉ. सौ. मधुरा भिडे

Madhura Bhide
madhura@recovalife.com
1 Comment
  • Prajakta patil
    Posted at 13:58h, 05 September Reply

    Thanks mam

Post A Comment